जालना - घनसावंगी तालुक्यातील 5222 लोकवस्ती असलेले पारडगाव हे जनावरांसाठी मोठी बाजारपेठ असलेले गाव. सोबतच इथे पुरातन वारसा लाभलेले पाचशे वर्षांपूर्वीचे जुने भैरवनाथाचे मंदिरही आहे. पन्नास टक्के मुस्लिम समाज आणि उर्वरित 50 टक्क्यामध्ये इतर सर्व समाज अशी परिस्थिती आहे. असे असतानाही गुण्यागोविंदाने हे गाव नांदत आहे. घनसांगी पासून वीस किलोमीटर अंतरावर मंठा आणि घनसावंगीच्या शिवेवर हे गाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी आमदार दत्तक योजनेत पारडगाव दत्तक घेतलेले आहे.
हेही वाचा - ...अन् थापाड्यांचे पाय लटलटले! भाजपच्या व्यंगचित्राला मनसेचा 'करारा जवाब'
पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतने राज्याचे पाणीपुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे ठराव दिलेला आहे. विशेष म्हणजे परतुर या गावी होत असलेल्या वॉटर ग्रीड योजनेपासून हे गाव अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, राजकीय खेळीमध्ये ही योजना या गावाला मिळेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गावकरी देखील वॉटर योजने बद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाझर तलाव आहे. या तलावाच्या बाजूलाच विहीर देखील आहे. मात्र, आडातच नाही तर पोहऱ्यात येईल कुठून अशी परिस्थिती इथे दिसून येते. मागिल सहा महिन्यापासून सुरू असलेले टॅंकरही किती दिवस सुरू ठेवायचे? असे म्हणत प्रशासनाने तेही बंद केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांवर सध्या पोटाचे आतडे तुटेपर्यंत हातपंपावर पाणी हापसण्याची वेळ आली आहे. दरम्यान, हे पाणी आणण्यासाठी लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कामी लावले जात आहे. मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायतपर्यंत येण्यासाठी दोन किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. यामुळे ग्रामपंचायतीमध्ये कोणी नवीन व्यक्ती आलेली दिसताच परिसरात विजेच्या तारावर टाकलेले आकडे काढण्यासाठी ग्रामस्थ विसरत नाहीत, हे देखील आदर्श गावच्या आदर्श ग्रामस्थांचे वैशिष्ट्यच म्हणायचे काय असा प्रश्नही पडतो? गावचे सरपंच म्हणून खातूनबी कुरेशी तर ग्रामसेवक म्हणून एस. व्ही. काचेवाड सध्या गावगाडा हाकत आहेत.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा राज ठाकरेंना कार्टूनमधून चिमटा!
गावामध्ये झालेली विकास कामे -
- पाटील हिंदू स्मशानभूमी पाच लाख रुपये.
- शादीखाना 25 लाख रुपये.
- भैरवनाथ मंदिर सभाग्रह आणि सिमेंट रोड बारा लाख रुपये.
- ग्रामपंचायत कार्यालय बारा लाख रुपये.
- आनंद बुद्ध विहार दहा लाख रुपये.
- यासह गावातील अंतर्गत रस्त्यांवर सुमारे पन्नास लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.