जालना - तालुक्यातील बाजीउमरद येथील ग्रामसेविका मंजुषा गोविंदराव जगधने हिला १२ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराची बाजिउमरद येथे १९२० चौरस फुटाची जागा आहे .या जागेची नोटरी बॉन्ड रजिस्टरद्वारे त्यांनी खरेदी केली होती. ही जागा तक्रारदारांच्या नावे करण्यासाठी व जागेची ग्रामपंचायतला नोंद घेऊन नमुना नंबर ८ अ चा उतारा देण्यासाठी तक्रारदार यांनी ग्रामसेविका जगधने यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावेळी जगधने यांनी ही नोंद घेण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितले, मात्र, जगधने यांनी पंधरा हजार रुपये दिल्याशिवाय काम होणार नाही, असे सांगितले. तडजोडअंती बारा हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर दिनांक ८ मे रोजी तक्रारदार हे जगधने यांच्या जालना येथील रामनगर पोलीस कॉलनीत असलेल्या राहत्या घरी पंचासमक्ष लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाले. जगधने यांनी खाजगी पंच कांता टोपे यांच्यासमोर तक्रारदार यांच्याकडे बाजिउमरद येथील सहान जागेची नोंद ग्रामपंचायतच्या नमुना नंबर ८ मध्ये घेण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणाची चौकशी करून आज सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही सुरू केले आहे. या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली, काशीद, चव्हाण, संतोष धांडे, नामदेव झुंबड, मनोहर खंडागळे, आत्माराम डोईफोडे, उत्तम देशमुख यांनी ही कारवाई केली.