जालना - जालन्यातील जाफराबादमध्ये मिरची कमी भावाने खरेदीवरून उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील वाद आणखी पेटला आहे. मिरचीची बाजारपेठेत आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी कमी भावाने मिरची खरेदीला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल असणाऱ्या हिरव्या मिरचीचा भाव व्यापाऱ्यांच्या मनमानीपणामुळे अवघ्या ५०० ते १००० हजार रुपये प्रतिक्विटलवर आला आहे, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मिरची कमी भावाने का खरेदी करता? असा सवाल काही मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विचारल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
या मारहाणीत तीन शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालन्यातील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. प्रेमसिंग धनावत, प्रसाद राजपूत, राजु धनावत अशी जखमी शेतकऱ्यांची नावे आहेत. या शेतकऱ्यांना व्यापारी बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाण प्रकरणी जाफ्राबाद पोलिसांत अजून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तर भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील दुसरा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात हिरवी मिरची ५०० रुपये दराने व्यापारी मागत असल्याने शेतकरी विक्रीसाठी आणलेली मिरची फेकून देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांची गळचेपी कधी थांबणार? असा सवाल उपस्थित आता सर्वसामान्य उपस्थित करत आहे.
हेही वाचा - दहीहंडीला परवानगी न मिळाल्यास सरकार विरोधात आंदोलन करणार -आशिष शेलार