जालना- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे छोटे-मोठे उद्योग सुरू होत आहेत. खरिपाच्या पेरणीलाही सुरुवात होत आहे. त्यामुळे पैशाची गरज भासत असल्याने बँकेत गर्दी होत आहे. जालना तालुक्यातील सामनगर साखर कारखाना येथील युनियन बँकेसमोर खातेधारकांनी पहाटे चार वाजल्यापासूनच गर्दी केली होती.
गर्दीतून आपला क्रमांक लवकर लागावा म्हणून शेतकरी पहाटे चार वाजताच बँकेसमोर रांगेत आहेत. खातेधारकांना भल्या सकाळी बँकेसमोर रांगा लावाव्या लागत असल्या तरी बँक नियमीत वेळेतच उघडते. त्यामुळे खातेधारकांना रांगेत ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे. शिवाय बँकेने शेतकरी खातेधारकांना दुपारी 11 ते 2 ची वेळ दिलेली आहे. या तीन तासांमध्ये होणारे काम आणि शेतकऱ्यांची गर्दी पाहता हा ताळमेळ बसणे अवघड आहे. मात्र, बँक कर्मचाऱ्यांच्याही अनेक अडचणी आहेत. त्यांनी वारंवार सूचना देऊनही शेतकरी विनाकारण रांगेमध्ये उभे राहत आहेत. संबंधित शेतकऱ्यांना टोकन देऊन बँकेमध्ये कोणत्या दिवशी यायचे याबबत सांगितले असतांनाही शेतकरी बँकेत येत आहेत. त्यामुळे बँकेत गर्दी होत आहे.