जालना - विविध कंपन्यांचे प्रमाणित केलेले बी-बियाणे सील बंद पाकिटात विक्रीसाठी येतात. त्यामधील काही बियाणे न उगवल्यास विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जात आहे. हा अन्याय असून विक्रेत्याविरुद्ध गुन्हे दाखल करू नये, अशी महाराष्ट्र खते, कीटनाशके व बियाणे विक्रेता संघटनेने मागणी केली आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने १० ते १२ जुलै असा तीन दिवसाचा बंद पुकारला आहे.
बदनापूर शहरासह तालुक्यातील कृषी ग्राहक केंद्रांनी व्यवहार बंद ठेवून तालुका कृषी अधिकारी व्यंकट टक्के यांना मागण्यांचे निवेदन दिले. कृषी ग्राहक केंद्र बंद असल्याने ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
राज्यात अनेक कंपन्यांमार्फत बी-बियाणे पुरवठा केला जातो. बी-बियाणांवर प्रक्रिया पूर्ण होऊन सरकारने प्रमाणित केलेले बियाणे असते. त्यानंतरच बी-बियाणे बाजारात विक्रीसाठी कंपनी उपलब्ध करून देते. मात्र, काही बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. अशा प्रकरणात बियाणे विक्रेत्याला दोषी ठरवून गुन्हे दाखल केले जात आहे. विशेष म्हणजे बियाणे सीलबंद पाकिटात विक्रीसाठी आलेले असते. त्यामुळे विक्रेत्याचा काही दोष नसतो, असा संघटनेने दावा केला आहे. यापुढे अशा प्रकरणात विक्रेत्याला दोषी ठरवू नये व विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करू नये, अशी संघटनेने मागणी केली आहे. संघटनेच्या बंदमध्ये बदनापूर शहरासह तालुक्यातील कृषी केंद्र चालकांनी सहभाग घेतला.
संघटनेच्या निर्णयानुसार बदनापूर तालुक्यातील कृषी केंद्र चालकांनी तालुका कृषी अधिकारी व्यंकट टक्के यांच्यामार्फत मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांकडे निवेदन दिले. यावेळी जगन्नाथ बारगजे, गौतम कटारिया, राहुल जऱ्हाड, अंकुश कोलहे, सतीश अडसूळ, विलास चव्हाण, कल्याण पवार,राजू दुधाणी, जयसिंग राजपूत, दिलीप कान्हेरे, संतोष सारडा, किरण रुणवाल, कैलास नागवे, शिवराज कडोस, गजानन मोरे, सरफराज मिर्झा, गणेश खरात, भुजंग दाभाडीकर, नरेश सावजी व देविदास पडुल आदी उपस्थित होते.
दरम्यान, सोयाबीनचे बोगस बियाणे असल्याच्या शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने बोगस बियाणे प्रकरणी कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.