जालना - मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या सोयाबीन, मूग, उडीद, भात आणि कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. मात्र, पावसाने काढणीच्या कामात व्यत्यय येत असून, पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
बळीराजाने खरीप हंगामासाठी कसेबसे कर्ज घेऊन पिकांची लागवड केली. त्यानंतर त्याने दिवस-रात्र करून ती पिके जगवली. आता काढणीचा हंगाम सुरू आहे. अशात परतीचा पाऊस सुरू झाला. यामुळे खरीपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. वाकडी परिसरातील कुकडी, वाडी, पळसखेडा बेचिराग, मनापुर, मलकापूर, तळणी आदी गावांसह भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने सुरू असलेल्या पावसाने कापूस झाडावरच खराब होत आहे.
काही शेतकऱ्यांनी आपल्या कुटूंबासह शेतातील कापूस वेचला. तो कापूस घरी कुलर, पंख्याखाली वाळवण्यासाठी ठेवला जात आहे. पण त्या कापसाला दुर्गंधी सुटली आहे. अशा कापूसला कवडीमोल भाव मिळतो. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या या शेतीमालाचे पंचनामे करून सरकारने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मदत न मिळाल्यास वेळप्रसंगी आंदोलन उभारू असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांना मदत मिळणार, हवामान खात्याच्या अंदाजानंतरच - सत्तार
हेही वाचा - इम्यूनोसे मशीन आणि कार्डियाक रुग्णवाहिकांचे राजेश टोपे यांच्याहस्ते लोकार्पण