जालना - औद्योगिक वसाहतीमध्ये स्टील उत्पादन करणाऱ्या मेटारोल इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आज दुपारी स्फोट झाला. या घटनेत एक कामगार ठार झाला असून, एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षण प्रश्न : साष्ट पिंपळगावात मराठा समाज करणार आंदोलन
अशी घडली घटना
जालना औद्योगिक वसाहतीमध्ये मेटारोल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी लोखंडाच्या सळ्या बनवते. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास या कंपनीत काम करणारे दोन कामगार अरविंद कुमार रामचंद्र राय आणि आकाश कुमार दीपनारायण सहा (वय 28) हे दोघे लोखंड वितळण्याच्या भट्टीवर असताना भट्टीमध्ये स्फोट झाल. या घटनेत आकाश कुमार दीपनारायण सहाचा मृत्यू झाला, तर अरविंदकुमार राय हा कामगार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मेटारोल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करणारे जगन्नाथ संपत प्रसाद वर्मा (रा. खरगपूर जि. आजमगड रा. ऊ.प्र) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आज सकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत आकाश कुमार दीपनारायण सहा यांची ड्युटी सिलिंग क्रमांक दोनवर होती आणि दुपारी दोन ते रात्री आठ पर्यंत अरविंदकुमार राय यांची सिलिंक क्रेनवर ड्युटी होती. त्या अनुषंगाने आकाश आपली ड्युटी सोडत असताना अरविंद व आकाश सिलिंगच्या केबिनमध्ये गेले, त्यादरम्यान 30 टन भट्टी मधील क्रमांक 2 मध्ये अचानक स्फोट झाला. यात भट्टीतील वितळलेले लोखंडाचे पाणी क्रेन क्रमांक दोनच्या केबिनवर गेले, आणि ते अरविंद व आकाश यांच्या अंगावर पडले. अरविंद याला उपचारार्थ शहरातील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तसेच, आकाश याला सरकारी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
कंपनी मालकच माहीत नाही
औद्योगिक वसाहतीमध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे. या सर्व कामगारांना सुपरवायझरच्या माध्यमातून या कंपन्यांमध्ये भरती केले जाते. मात्र, हे कामगार आणि सुपरवायझर कधीही मालकाचे नाव पुढे येऊ देत नाहीत. या प्रकरणातही तक्रारदार कंपनीत सुपरवायझर असून देखील कंपनी मालकाचे नाव माहीत नसल्याचे समजले. असेच तक्रारीत नमूद केले आहे. परंतु, कंपनी मालकाने कामगारांना कोणतेही साधन सामग्री, अग्निरोधक वस्त्र, हेल्मेट किंवा प्रथमोपचार साधने न दिल्यामुळे ही दुर्घटना घडली. आणि या सर्व प्रकाराला कंपनी मालकच जबाबदार असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. वर्मा यांच्या तक्रारीवरून चंदंनजिरा पोलीस ठाण्यात कलम 304 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - जालना: राजेश टोपेंच्या उपस्थितीमध्ये कोरोना लसीकरणाचा शुभारंभ