जालना - कोरोना संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले विचार स्वीकारावेत आणि एकजुटीने कोणाशी लढा द्यावा, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालन्यात केले. नवीन जालना भागात अग्रसेन फाऊंडेशनच्या सुसज्ज इमारतीमध्ये 110 खाटांचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या 110 खाटांच्या सेंटरमध्ये ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, त्यांनाच येथे ठेवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
लसीकरण लांबण्याच्या मार्गावर -
1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र, लसीच्या उपलब्धते अभावी हा उपक्रम लांबण्याच्या मार्गावर आहे. '18 ते 44 वयोगटातील सर्वांना ही लस मिळावी, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, कोविशिल्डचे 20 मेपर्यंत जेवढे उत्पादन होईल, तेवढ्याच लसी केंद्राच्या माध्यमातून वितरीत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून भारत बायोटेकशी चर्चा सुरू असून या दिशेनेदेखील प्रयत्न सुरू असल्याचे टोपे म्हणाले.