जालना - कोरोना पसरू नये म्हणून प्रशासन हरतर्ऱ्हेने प्रयत्नशील असून संपूर्ण राज्यात संचारबंदी व जिल्हा सिलबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बदनापूर येथील वरूडी येथील चेकपोस्टवर वाहने तपासणी करण्याचे काम पोलिसांच्या वतीने सुरू आहे. असे असले तरी काही वाहने पोलिसांना गुंगारा देऊन निघत असल्यामुळे प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही सूचना पाळण्याची आवश्यकता दिसून येत आहे.
जिल्ह्यातील संपूर्ण संचारबंदी व जिल्हा बंदीचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिलेले आहेत. त्या अनुषंगाने येथील वरूडी येथील रुग्णालयाजवळ चेक पोस्ट तयार करण्यात आले असून या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यातील वाहने येऊ नये म्हणून तपासणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बॅरिकेट्स लावून पोलिसांद्वारे वाहनांची तपासणी करण्यात येऊन त्यांना वापस पाठवण्यात येत असतानाही औरंगाबाद-जालना हमरस्त्यावर वाहतूक सुरुच दिसली.
वरूडी येथे बॅरिकेटस लावलेले असल्यामुळे गेवराईमार्गे वाहने येऊन पुन्हा हमरस्त्याला लागत असल्याच्या शक्यतेवरून गेवराई बाजार परिसरातील ग्रामस्थ व तरुणांनी गेवराई फाट्यावर थेट आडव्या दोऱ्या बांधून हा रस्ता दुपारनंतर बंद केलेला दिसून आला. याबाबत तरुणांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, काही वाहने शेकट्याहून थेट गेवराई फाटामार्गे येत आहेत. त्यामुळे, गेवराई बाजार परिसरातील नागरिकांना या कोरोनाची लागन होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून आम्ही गेवराई गावात येणारा हमरस्ताच बंद करण्याचा निर्णय् घेतला असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे वरूडी फाटा येथे पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तपासणी करण्यात येत आहे. तसेच, बाहेर जिल्ह्यातील सर्व वाहने थांबवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले तरी औरंगाबाद-जालना मुख्य रस्त्यावर मात्र वाहनांची वर्दळ दिसूनच येत आहे. त्यामुळे, नागरिकांमध्येही जागरुकता नसल्याचे चित्र असून प्रत्येकाने प्रशासनाच्या सूचना पाळण्याची आवश्यकता दिसून येत आहे.
हेही वाचा - गरजूंना कुरियरद्वारे मिळणार रक्तपुरवठा
हेही वाचा - जालन्यात 'लॉकडाउन'चं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई