जालना - एका हिंदी न्यूज चॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या अर्णब गोस्वामी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
हिंदी न्यूज चॅनलचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी काँग्रेस अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. 16 एप्रिल रोजी रिपब्लिकन भारत टीव्ही चॅनलवर पालघरमध्ये झालेल्या हत्याप्रकरणी साधूंविषयी चर्चा सुरू होती. त्यावेळी अर्णब गोस्वामी यांनी सोनिया गांधीबद्दल गरळ ओकली.
पालघर प्रमाणे हत्याकांडाचा प्रकार जर पादरी आणि मौलवींबद्दल झाला असता तर, इटलीच्या सोनिया गांधी गप्प बसल्या असत्या का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या भावना दुखावल्या आहेत, आणि सोनिया गांधी यांचा अवमानही झाला आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. या निवेदनावर राजेंद्र राख शेख महेमुद यांच्या सह्या आहेत.