जालना - 'मराठवाड्यावर पाण्याच्या बाबतीत अन्याय झाला आहे. पण, 880 कोटी रुपयांचे 'बळीराजा जलसिंचन'चे सहा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता जालन्यासाठी मंजूर केले आहेत. त्याचे कामही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे मराठवाड्यावर झालेला हा अन्याय दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे', असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या महाजनादेश यात्रेदरम्यान केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली महाजनादेश यात्रा गेल्या दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात होती. आज तिसऱ्या दिवशी जालना येथील मुक्कामानंतर मंठा येथे ही यात्रा गेली आहे. तत्पूर्वी सकाळी दहा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी एकंदरीत मराठवाड्याच्या परिस्थिती संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली .
ते म्हणाले "आमच्या यात्रे प्रमाणेच काँग्रेसने देखील यात्रा काढली आहे. त्यांच्या 21 सभा पैकी 18 सभा या छोट्या हॉलमध्ये झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांना प्रतिसाद नाही असे, असले तरीही ही माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत". दरम्यान, ज्या गतीने समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे ती गती पाहता 2020 मध्ये या महामार्गावरून वाहने धावतील. त्यामुळे जालना आणि औरंगाबाद येथील औद्योगिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, अशी आशादेखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.