जालना - भाजपा मित्रपक्षांना सोबत घेऊन यापुढे सर्व निवडणुका स्वतःच्या ताकदीवर लढेल लढवेल, ज्यांनी मोदींच्या नावावर मते मागितली आणि आमचा विश्वासघात केला, अशा विश्वास घातक्यांसोबत आम्हाला काम करायचे नाही, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगवला आहे.
'स्वबळावर लढू आणि जिंकून दाखवू'
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज (शनिवार) जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्यावर प्रेम करणाऱ्या पक्षांना सोबत घेऊन यापुढे निवडणुका लढवून त्या जिंकून दाखवू असे पाटील यावेळी म्हणाले.
'अख्तरांना हिंदूराष्ट्र ही संकल्पना समजली नाही'
जावेद अख्तर यांच्यावर देखील त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडले, जावेद अख्तर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुराष्ट्र ही संकल्पना कळले नाही असे म्हणत त्यांनी अख्तर यांच्यावर टीका केली.
मनसेसोबत युतीची चर्चा नाही -
नाशिक येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत युतीची चर्चा झाली होती का? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी केला असता ते म्हणाले की, मनसेसोबत युतीचा विषय झालेला नाही. राज ठाकरे यांच्यासोबत नाशिकमध्ये अचानक भेट झाली होती, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
राऊतांच्या विधानवर बोलण्याचे टाळले -
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राज्यपालांकडे पाठवलेले 12 नावे हे काही तालिबानी प्रशिक्षण घेऊन आलेले नाहीत, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते. यावर पाटील यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
'सीबीआयचे काम सीबीआयला करू द्या'
कोरोनाच्या निर्बंधाचे कारण देऊन सरकारला लोकांना जास्त दिवस वेठीस धरता येणार नाही, असे सांगत अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयचे काम सीबीआयला करू द्या असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाऊसने फसवून तयार केले पॉर्न व्हिडिओ- माजी मिस इंडिया युनिव्हर्सचा आरोप