जालना - बीड डेपो आगाराची मालवाहतूक करणारी बस नानेगाव येथील सुखना नदीवरील बांधकाम चालू असलेला पूल वाहून गेल्यामुळे नदीच्या प्रवाहात अडकली. मात्र, पुलाच्या कामासाठी आणलेल्या पोकलँडमुळे ती लगेच वाचवणे शक्य झाले. तातडीने मदत मिळाल्यामुळे बस वाहून जाता-जाता वाचली. तसेच, कोणतीही हानी झाली नाही.
सुखना नदीवरील हा पूल वारंवार वाहून जातो. यामुळे काही गावाचा संपर्क तुटतो. आज सकाळीही 11 वाजताच्या सुमारास नदीला जास्त पाणी आले. त्या पाण्यात पूल वाहून गेला. बस चालकाला याचा अंदाज न आल्याने त्याने पुलावरून जाणाऱ्या पाण्यातून बस पुढे नेली. मात्र, अंदाज न आल्याने बस वाहून जात होती. पुलाच्या कामासाठी आणलेल्या जेसीबीच्या सहाय्याने बस अडकवून ठेवण्यात आली. नंतर पोकलँडला दोरी बांधून बस मागे ओढण्यात आली. यात कोणतेही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा - घाणेवाडी जलाशय पूर्णपणे भरल्यामुळे जालनाकर दीड वर्षासाठी चिंतामुक्त
या नदीला तीन महिन्यांपासून सतत पाणी वाढत आहे. राजूर ते पैठण या नवीन महामार्गाचे काम नुकतेच झाले. सुखना नदीवरील पुलाचे काम अर्धवट झाल्याने या पुलाच्या बाजूने दुसरा मातीचा पूल तयार करण्यात आला. मात्र, हा पूल पाणी आले की नेहमी वाहून जातो. यामुळे लोकांना जीवावर उदार होऊनच यावरून गाड्या चालवाव्या लागतात. तसेच, पायीही याच पाण्यातून रस्ता शोधत जावे लागते.
याअगोदरही या पुलावरून दोन मोटारसायकली वाहून गेल्या आहेत. या सततच्या पाण्यामुळे नदीचा कट्टा, शेजारची शेते जवळजवळ पूर्णच वाहून गेलीत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. हे शेतकरी मदतीची अपेक्षा करत आहेत. तसेच, या पुलाचे काम लवकर करून द्यावे अशी मागणी गावकरी करत आहेत.