जालना - जिल्ह्यातील परतूर येथील व्यापारी राजेश नहार यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात राजेश नहार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. भर रस्त्यात घडलेल्या या गोळीबार आणि हत्या प्रकरणाने जालन्यामध्ये खळबळ उडाली आहे.
जालना ते मंठा रस्त्यावरील डांबरी गावाजवळ शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास व्यापारी राजेश मानकचंद नहार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. व्यापारी नहार हे जालन्याहून परतूरकडे त्यांच्या चारचाकी वाहनातून जात होते. त्यावेळी ही घटना घडली. अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यावेळी त्यांना जखमी अवस्थेत जालना येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
परतूर येथील व्यापारी राजेश नहार आधीच वादात सापडले होते. त्यांनी बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत आणि व्यापारी विमलराज सिंघवी यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले होते. तसेच या दोन्ही प्रकरणांत नहार यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. या दोन्ही प्रकरणांचा सध्या तपास सुरू आहे. दरम्यान, नहार यांचा मृतदेह औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, सोपानराव बांगर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, परतूरचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्यासह अधिकारी यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली आहे.