जालना - बहुजन समाज पक्ष आता जालना लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. महेंद्र सोनवणे हे बहुजन समाज पक्षाच्या वतीने उद्या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बहुजन समाज पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेला लक्ष्मण सोनवणे, रोहिदास गंगातीवरे, सुधाकर बडगे, हरीश रत्नपारखे, बाबुराव बोर्डे, शेख बबलू भाई, शेख नबी उपस्थिती होते. महेंद्र सोनवणे हे मूळचे जालना जिल्ह्यातील आहेत. मात्र, सध्या ते औरंगाबाद येथे स्थायिक आहेत. उद्या सकाळी ११ वाजता नूतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
यावेळी महेंद्र सोनवणे यांनी, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शरदचंद्र वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. वानखेडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे हेदेखील नगरसेवक होऊ शकले नाहीत. मात्र, आता लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.