जालना - कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे मुंबई येथून एका 14 मुलीला पळवणार्या वीस वर्षीय तरुणाला जालन्यातून अटक झाली आहे. तालुका पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलीस आरोपीला सोबत घेऊन गेले आहेत.
काय आहे प्रकरण -
मूळचा जळगाव येथील असलेला राहुल काळू राठोड (वय 20) याने मुंबई येथून एका चौदा वर्षीय मुलीला पळवून आणले होते. मे 2020मध्ये लॉक डाऊनदरम्यान ते मुंबईतून जालन्यात आले होते. जालन्यातील इंदेवाडी परिसरात असलेल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये दोघेही बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. या बांधकामाच्या बाजुलाच एका भाड्याच्या खोलीमध्ये ते राहत होते. दरम्यान, मुंबई पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच त्याने अल्पवयीन मुलीला 3 मार्च रोजी मुंबईला पाठवून दिले. मुलगी मुंबईला आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय वेळापुरे यांच्यासह रत्नाकर बागवे, महिला पोलीस कर्मचारी वंदना माळी हे गुरुवारी जालन्यात आले होते. त्यांनी मुलीला पळवणाऱ्या राहुल काळू राठोड या तरुणाला अटक केली.
मुलीच्या वडीलांनी केली होती तक्रार -
मुलगी स्वखुषीने तरुणासोबत आली असली तरी, ती अल्पवयीन असल्यामुळे कायद्याच्या तरतुदीनुसार हा अपहरणाचा प्रकार आहे. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यामध्ये तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबईचे पोलीस आरोपीच्या शोधात जालन्यामध्ये आल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल रामराव चाफळकर यांनी त्यांना मदत केली.