जालना - पावसाळा सुरू होऊन खरीप हंगामातील पेरणीही संपत आली आहे. तरीही राज्यातील महाआघाडीच्या सरकारने पीक कर्ज माफीची अंमलबजावणी केलेली नाही. ती त्वरित करावी व शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी भोकरदन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया समोर भाजप आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.
पावसाळा सुरू झाला तरीही खरीप हंगामासाठीचे पीक कर्ज अद्यापही शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. राज्यात कोरोनाचे संकट असले, तरी पाऊस, खरीप हंगाम तसेच शेतीची कामे थांबवता येत नाहीत. त्यामुळे महाआघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज देणे गरजेचे असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी आमदार संतोष दानवे यांच्यासह जि. प. सदस्या आशा पांडे, सुरेश शर्मा, सतीश रोकडे, विनोद मिरकर, नगरसेवक रणवीरसिंह देशमुख, दादाराव राऊत, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.