जालना -जालना शहरामध्ये गेल्या सहा महिन्यापासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांना व मुद्देमालाचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे. पोलिसांनी दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.
..असे सापडलेत आरोपी
सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील दुचाकीस्वारांचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर हे स्वामी विवेकानंद हॉस्पिटल समोरून जात होते. त्याचवेळी दुचाकीवर फिरत असलेले अशोक भिकाजी तरकसे (वय 20 रा. कन्हैया नगर) आणि आकाश रावसाहेब देवकर (वय 30 रा. लालबाग) हे त्यांच्या वाहनाचा वेग वाढवून पोलिसांना पाहून पळाले. त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी या दोघांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याजवळील दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, नंतर पोलीसी खाक्या दाखवताच दुचाकी चोरीची कबुली त्यांनी दिली. तसेच, अन्य २ दुचाकी गोल्डन जुबली शाळेजवळ असलेल्या महादेव मंदिराच्या पाठीमागे झुडपांमध्ये लपवून ठेवल्याचे आरोपींनी सांगितले.
हेही वाचा - सामान्य रुग्णालय जुन्या इमारतीत आणण्यासाठी हालचालींना वेग
पोलिसांनी आरोपींद्वारे लपवून ठेवलेल्या २ दुचाकी व वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली आहे. त्यानंतर आणखी चौकशी केली असता आणखी २ दुचाकी आणि एक स्कुटी चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. ही तिन्ही वाहने फुलब्रिकर नाट्यगृह परिसरात लपून ठेवले असल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन ही तिन्ही वाहने जप्त केली आहेत.
१ लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त
पोलीस पथकाचे प्रमुख रमेश रुपेकर यांनी ही सर्व वाहने सदर बाजार पोलीस ठाण्यात आणून जमा केली. या वाहनांची बाजारामध्ये 1 लाख 25 हजार एवढी किंमत आहे. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख रमेश रुपेकर यांच्यासह रामप्रसाद रंगे, धनाजी कावळे, समाधान तेलंग्रे, सुधीर वाघमारे, स्वप्नील साठेवाढ या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा - जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची अकोल्याला बदली