जालना - बदनापूर तालुक्यातील सुखना नदीतील पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदीवरील गारखेडा येथील प्रकल्प पूर्ण क्षमतेना भरला आहे. त्यामुळे सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने तब्बल 15 वर्षानंतर नदीला मोठा पूर आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बदनापूर तालुक्यातील बाजारवाहेगाव, नानेगाव, चिकनगांव, बदापूर परिसरातील शेतकऱ्यांवर यंदा निसर्गाची अवकृपा थांबवण्याची चिन्हे दिसत नाही आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने सुखना नदीला पूर आल्यामुळे ही नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील आजूबाजूच्या शेतात पाणी घुसून पिकांचे नुकसान होत आहे. बदनापूर तालुक्यातील मागील चार ते पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. या वर्षी मात्र पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. पावसाळा सुरू होऊन जेमतेम दीड ते दोन महिन्याचा कालावधी लोटलेला असताना तालुक्यातील वार्षिक सरासरीइतका पाऊस झाला आहे.
रोषणगाव व रोहिलागडमध्ये सतत तीन ते चार वेळेस अतिवृष्टीने तडाखा दिल्यामुळे या भागातील खरीपांची पिके दुबार- तिबार पेरणीनंतर नष्ट झाली आहे. अतिवृष्टीने या भागातील शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. बदनापूर तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी 685 मि.मी. इतकी आहे. 31 जुलैला दुपारी 12 वाजेपर्यंतच 651.4 मि.मी. इतका पाऊस पडल्यानंतर सायंकाळीही तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे वार्षिक सरासरी इतका पाऊस झाला आहे.
बदापूर, चिकनगाव, वाकुळणी, बाजार वाहेगाव परिसरातून वाहणाऱ्या सुखना नदीवर औरंगाबाद जिल्हयात गारखेडा धरण आहे. या धरणाच्या पानलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण 2006 नंतर यावर्षी पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे सुखणा नदीला मोठा पूर आला आहे. धरणाच्या पानलोट क्षेत्रात जर आणखी पाऊस झाला तर ही नदी रौद्ररुप रूप धारण करण्याची शक्य़ता असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, सुखना नदी जवळपास 15 वर्षानंतर प्रवाहित झाल्यामुळे पुढे पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाचा प्रश्नही सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी सुखवला जरी असला तरी सद्यस्थितीत मात्र खरीप हंगामातील दुबार- तिबार केलेली पिकांच नुकसान झाल्यामुळे प्रशासनाने तात्काळ मदत देण्याची अपेक्षा शेतकरी करत आहेत.