जालना - जालना, घनसावंगी आणि परतूर विधानसभा मतदारसंघातील 100 गावांसाठी 132 केव्ही उपकेंद्र नेर येथे नियोजित आहे. हे उपकेंद्र इतरत्र हलवू नये, या मागणीसाठी माजी मंत्री तथा परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली आज नेरे येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जालना तालुक्यातील उटवद येथे तत्कालीन मंत्री राजेश टोपे यांनी 33 केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन करून बोगस सडकं नारळ फोडलं होतं आणि आता आम्ही सुरू केलेलं हे उपकेंद्र पळवण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे राजेश टोपे यांनी आमच्याशी पंगा घेऊ नये, असा गर्भित इशारा लोणीकर यांनी दिला.
नेर येथे लाक्षणिक उपोषण -
जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नेर येथे आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या परिसरातील गावांची विचित्र अवस्था आहे. ही गावे विधानसभा मतदारसंघासाठी परतूर मध्ये लोकसभा मतदारसंघासाठी परभणी जिल्ह्यात तर शासकीय कामांसाठी जालना तालुक्यात आहेत. त्यामुळे गेल्या 50 वर्षांपासून या गावांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले गेले.
27 सप्टेंबर 2019 ला भूमिपूजन -
फडणवीस सरकारच्या काळात राज्याचे पाणीपुरवठा तथा जालनाचे पालकमंत्री असताना बबनराव लोणीकर यांनी नेर येथे 132 केव्ही उपकेंद्राचे उद्घाटन केले होते. त्यासाठी ऊर्जा मंत्र्यांनी 43 कोटी 68 लाख रुपये मंजूरही केले होते. तसेच 14 एकर जमीनही अधिग्रहित केली आहे. उपकेंद्र उभारण्याचा कार्यारंभ आदेश दिनांक 29 मे 2020 ला निघाला आहे आणि त्यानुसार निविदा काढून तेस्ला ट्रान्समीशन, भोपाळ या कंपनीला कंत्राटही दिलेले आहे. असे असताना देखील जालनाचे पालकमंत्री राजेश टोपे हे उपकेंद्र दुसरीकडे हलवत आहेत. खरेतर या उपकेंद्रावर परतूर मतदारसंघातील 44 गावे, मंत्री राजेश टोपे यांच्या घनसांवगी मतदार संघातील 29 गावे, तर जालना म्हणजेच आ. कैलास गोरंट्याल यांच्या मतदारसंघातील 28 गावांना याचा फायदा होणार आहे.
असे असताना देखील स्वतः कोणतेही विकास काम न करता आम्ही केलेली कामे पळूवून नेऊन आमच्याशी पंगा घेऊ नये, पालकमंत्री राजेश टोपे यांच्यात धमक असेल तर त्यांनी उटवडलाला दुसरे 132 केव्ही उपकेंद्र सुरु करावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मात्र ते हे करणार नाहीत कारण यापूर्वी त्यांनी मंत्री असताना 33 केव्हीचे बोगस उद्घाटन करून सडकं नारळ फोडलं होतं. त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी नवीन उपकेंद्र उभं करावे मात्र आमच्याशी पंगा घेऊ नये, असा गर्भित इशारा बबनराव लोणीकर यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांना दिला.