जालना - डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायभवन येथील निवडणुकीचे साहित्य त्वरित काढून घेऊन संगणक प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्यांसाठी तात्काळ सुरू करावे या प्रमुख मागणीसाठी अन्य मागण्यांसंदर्भात सोमवारी आंबेडकरी जनतेने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
याव्यतिरीक्त, न्यायभवनाच्या जागेचा गैरवापर केल्यामुळे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांना निलंबित करण्यात यावे, भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी 2 जानेवारी 2018 रोजी ज्या दलित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यात यावे, औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून निघणारे प्रदूषण टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्र बसविण्यात यावे, मराठवाडा साहित्य परिषद जालना चे अध्यक्ष रमेश भुतेकर यांची निवड बेकायदेशीर असल्याने त्यांना तात्काळ अध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे व शासकीय गायरान आणि पडीक जमिनी कसनाऱ्यांच्या नावे करण्यात याव्यात या मागण्यांचाही यामध्ये समावेश आहे.
या धरणे आंदोलनावेळी ऍड .बीएम साळवे, ऍड.शिवाजी आदमाने, किशोर माघाडे, मधुकर घेवंदे, राजेंद्र हिवाळे, वीरेंद्र रत्नपारखे ,राजेश कुरील, अशोक साबळे, महेंद्र रत्नपारखे, आदी उपस्थित होते.