जालना - सध्या जगभरात कोरोना व्हायरसमुळे नागरिक हैराण झाले आहेत. देशातही सगळीकडे लॉकडाऊन असून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब नागरिकांचे पोट कसे भरणार, यासाठीच म्हणून भोकरदन शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ५०० कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.
हेही वाचा... 'तू कोरोना आहेस, घरातून चालती हो..!' लॉकडाऊन काळात घरगुती हिंसाचारात वाढ
भोकरदन शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगराध्यक्ष अॅड. हर्षकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन मित्र मंडळातर्फे हातावर पोट असणाऱ्या गरिबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या. यामध्ये गहू ५ किलो, साखर १ किलो, मीठ, तांदुळ १ किलो, तुरदाळ, चहा पावडर, साबण, गोडतेल आदी वस्तूंचा समावेश आहे.
या वस्तुंचे वाटप करत असताना पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, जेष्ठ पत्रकार विजयभाऊ सोनवणे, संस्थाचालक नारायण जिवरग, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव मिसाळ, नगरसेवक विजय बापू इंगळे, हमदुसेट चाऊस, समता परिषद तालुकाध्यक्ष विलास शिंदे यांच्यासह भोकरदन मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.