जालना - मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या निवासस्थानी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने एक दिवसीय धरणे व जागर गोंधळ आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा आरक्षण त्वरित लागू करावे, आरक्षण लागू होईपर्यंत शासनाने कोणतीही नोकरी भरती करू नये, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवेच्या परीक्षाही आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत घेऊ नये, अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे.
या अंतर्गत राज्यातील सर्व आमदार-खासदार यांच्या निवासस्थानासमोर, संपर्क कार्यालयासमोर आंदोलने करण्यात येत आहे. याद्वारे त्यांना मराठा आरक्षणासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर आज आमदार नारायण कुचे यांच्या निवाससस्थानासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन व जागर गोंधळ आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दुपारी आमदार नारायण कुचे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, मराठा क्रांती मोर्चातील समन्वयाकांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागण्यांचाही समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयात चांगल्या वकिलांची नेमणूक करून त्वरित ही स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी आमदार कुचे यांनी मराठा समाजासोबत असून समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.