जालना - जुन्या जालन्यातील कांचन नगर भागात राहणारी एक अल्पवयीन मुलगी घरातील तिच्या आईच्या दागिन्यांसह रोख 50 हजार रुपये घेऊन बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी आईने कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून एका तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कांचन नगर भागात राहणाऱ्या एका महिलेला सतरा वर्षांची एकुलती एक मुलगी आहे. या महिलेचे पती भोळे आहेत. त्यामुळे या महिलेने घरकाम करत इतरांच्या घरचीही कामे करून तिच्या मुलीला वाढविले आहे. सध्या ही मुलगी नववीत शिकत आहे. आज (ता. 4) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तिची आई अंघोळीला गेली असता घरातील सोन्याचे दागिने आणि रोख 50 हजार रुपयांच्या रोख रकमेसह ही मुलगी गायब झाली आहे.
आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलीचे एका तरुणासह गेल्या दोन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. त्यानेच तिला फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय या महिलेने दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. मुलगी घरातून जाताना रोख 50 हजार रुपये, तीन ग्रॅमचे सेवन पीस, सात ग्रॅमचे गंठण, कानातील सोन्याचे जोड, अंगठी, रिंग असे सुमारे दोन तोळे सातशे मिलिग्रॅम वजनाचे दागिने घेऊन गेली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने तिला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध (रा. कांचन नगर, जुना जालना) कलम 363 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.