जालना - केंद्र सरकारने 370 कलम हटवले त्यामुळे काश्मिरी जनता खऱ्या अर्थाने आता भारतीय झाली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचे आपण स्वागत करू, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की, महाराष्ट्राला समाजसुधारकांचा मोठा वारसा आहे. त्यांचे स्मरण करून त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर आपण चालले पाहिजे. जेणेकरून त्यांचा नावलौकिक कायम राहील.
या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थित असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेऊन प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. कार्यक्रमाला माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर आदींची उपस्थिती होती.