जालना- कोरोना काळामध्ये विनावेतन काम करणाऱ्या 54 शिक्षकांनी आत्महत्या केला असल्याचा दावा डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आला आहे. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
ऑनलाईन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित-
कोरोनाकाळात बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. कोरोना परिस्थितीमध्ये ऑनलाइन शिक्षण जरी सुरू असले तरी सर्वच विद्यार्थ्यांना हे शिक्षण घेता येत नाही. वस्ती- तांड्यावर ऑनलाईन शिक्षण पूर्णपणे बंद आहे.
पगार नसल्यामुळे शिक्षकांची आत्महत्या-
कोरोनाकाळात विनावेतन काम करणारे १० हजार शिक्षक आहेत. मात्र, उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे त्यापैकी ५४ शिक्षकांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना वेतन मिळवून देण्यासाठी परिषदेचा लढा सुरु असल्याचेही पाटील म्हणाले.
१७ हजार शिक्षकांचे विनावेतन काम-
अनुदानित शाळेच्या तुकड्या वाढविण्यात आल्या आहेत. तुकड्या वाढल्या म्हणजे शिक्षकांना वेतन देणेही बंधनकारक असते. मात्र, महाराष्ट्रातील सात हजार शिक्षक सध्या या वाढीव तुकड्यांमध्ये विनावेतन काम करत आहेत .पहिले दहा हजार आणि हे वाढीव तुकड्यामुळे वाढलेले सात हजार असे एकूण 17 हजार शिक्षक महाराष्ट्रामध्ये विनावेतन काम करत असल्याचा दावाही भोयर यांनी केला.
या कोअर कमिटीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मण नेव्हल, सचिव सुनील चव्हाण, कार्याध्यक्ष दयानंद जाधव ,राज्य समन्वयक शामराव लवांडे, नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर ,आदींची उपस्थिती होती. याच बैठकीत परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रदीप सोळंके यांची तर प्राचार्य डॉक्टर विठ्ठल एरंडे यांची प्रदेश कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.