जालना - शहरातील गरीब शहा बाजारांमध्ये एका गोदामामधून ऑक्सिजनचे 49 सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. महसूल प्रशासन आणि औषधी प्रशासनाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.
गरीब शहा बाजारामध्ये सतीशचंद सुभाषचंद जैन (रा. नेहरू रोड) यांचे एक गोदाम आहे. या गोदामांमध्ये ठेवलेले 49 ऑक्सिजन सिलिंडर या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री साडेअकरा वाजता छापा टाकून जप्त केली. महसूल विभागाचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ तर अन्न व औषधी प्रशासनाच्या निरीक्षीका अंजली मिटकरी, पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर यांच्यासह तिन्ही विभागाचे कर्मचारी देखील उपस्थित होते.
दरम्यान जप्त करण्यात आलेल्या सिलिंडरमध्ये चाळीस मोठे आणि नऊ लहान असे एकूण 49 सिलेंडर आहेत. दरम्यान गोदामाचे मालक सतीशचंद जैन यांनी सांगितले की, या सिलिंडरमध्ये काही नायट्रोजनचे आणि काही ऑक्सिजनचे रिकामे सिलिंडर आहेत. परंतु तहसीलदारांनी हे सर्वच सिलिंडर जप्त केले असून त्याची शहानिशा केल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
या मध्ये ऑक्सिजन भरलेले सिलिंडर आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासनाची वेगळी कारवाई आणि महसूल प्रशासनाची वेगळी कारवाई अशा दोन कारवाया या गोदाम मालकावर होऊ शकतात.