जालना - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये जिल्ह्यात 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज लक्ष्मीनारायणपुरा भागातील 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला .
ही 60 वर्षीय महिला मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. तत्पूर्वी या महिलेने शहरातील एका खासगी रुग्णालयात देखील उपचार घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेला मधुमेह, रक्तदाब आदी आजार असल्यामुळे डॉक्टरांनी तिला सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यास सांगितले.
त्यानुसार मंगळवारी ही महिला सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने या महिलेच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे महिलेवर कोविड-19 रुग्णालयात उपचार सुरू होते.
या उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी या महिलेचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परतूर तालुक्यातील मापेगाव येथील एक जण, जालना शहरातील मोदीखाना भागातील एक 80 वर्षीय वृद्ध आणि आजची 60 वर्षीय महिला यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे हे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.