जालना - नवा आणि जुना जालना अशा एकाच शहराचे दोन भाग करून दोन्ही शहराच्या मधून वाहत असलेल्या कुंडलिका नदीवर इंग्रजांनी एक पूल बांधला होता. हा सर्व पूल लोखंड वापरून तयार केल्यामुळे या पुलाला लोखंडी पूल असे ओळखले जात होते. 135 वर्षांपूर्वीच्या फुलाचे आयुष्य संपल्यामुळे हा पूल सध्या पाडण्यात येत आहे. या पुलाचे अवशेष नगरपालिकेच्या संभाजी उद्यानामध्ये जतन करून ठेवण्यात येणार आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून लोखंडी पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. आजही हा पूल अत्यंत मजबूत स्थितीत आहे. मात्र, या फुलाचे आयुष्य संपल्याचे पत्र इंग्लंड सरकारने जिल्हा प्रशासनाला पूर्वीच पाठवले होते. त्यानुसार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हा पूल पाडण्यावर शिक्कामोर्तब झाले आणि नवीन पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन झाले. मात्र, या पुलासोबत जालनाकरांच्या अनेक आठवणी जोडल्या आहेत. त्यामुळे या फुलाचे जतन व संवर्धन करावे अशी मागणीही पुढे येत होती. मात्र, नेमके करायचे काय? हा संभ्रम आजही कायम आहे.
दरम्यान, नगरपालिका प्रशासनाच्यावतीने या पुलाचे सांगाडे सध्या मोतीबाग अर्थात छत्रपती संभाजी उद्यान येथे नेऊन टाकले जात आहेत. मात्र, या पुलाचे पुढे काय करायचे याबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, नागरिकांच्या मागणीनुसार हा पूल मोतीबागेत जमिनीवर ठेवून त्याचे सांगाडे जतन करण्याचा प्रयत्न नगरपालिका करणार असल्याचे समजत आहे. मात्र, या विषयीचा निर्णय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेणार आहेत.