जालना - अतिरिक्त औद्योगिक परिसरात असलेल्या लोखंडी सळई बनवणाऱ्या एका कारखान्यात वितळते लोखंड अंगावर पडल्यामुळे 10 कामगार भाजल्याची दुर्घटना शनिवारी (19 जून) सकाळी घडली.
जखमी कामगार ओडिशातील
जालना औद्योगिक परिसरात सप्तशृंगी स्टील या लोखंडी सळई बनवणाऱ्या कारखान्यामध्ये आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वितळत्या लोखंडाचे पाणी अंगावर पडले. त्यात सुमारे 10 कामगार जखमी झाले आहेत. यापैकी 4 कामगारांवर जालना शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामध्ये मानस शामा नायक (26 वर्षे), प्रशांत पलई (25 वर्षे), समीर बेरा (40 वर्षे) आणि गणेश बेरा (25 वर्षे) या ओडिशामधील 4 कामगारांचा समावेश आहे. तर उर्वरित 6 कामगारांना औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे.
कंपनीचा मालक-व्यवस्थापकाविरूद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी समीर फकीर बेहरा (40 वर्षे) या ओडिशा येथील कामगाराने दिलेल्या तक्रारीवरून, सप्तशृंगी स्टील कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध चंदंजिरा पोलीस ठाण्यात कामगारांना अग्निपासून बचाव करणारे साहित्य न पुरविणे, हेल्मेट व इतर साहित्य न देणे आदी कारणांवरुन भा. दं. वि. 279, 377, 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - ''मी देशद्रोही नाही, लक्षद्वीपला न्याय मिळेपर्यंत संघर्ष करेन'' - आयशा सुल्ताना