जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील झाडी गावाच्या शेतशिवारात एका २३ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. सुनील सुभाष पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री ७ ते ८ वाजताच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सुनील पाटील हा शुक्रवारी रात्री स्वतःच्या शेतात खाटेवर झोपलेला होता. त्यावेळी त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्याची हत्या केल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळी ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी याची माहिती अमळनेर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
खुनाचे कारण अस्पष्ट-
या घटनेनंतर अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू असून पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.