जळगाव - गावठी दारुच्या भट्ट्यांवरील डब्बे फोडून नुकसान केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात विळा आणि कुऱ्हाडीने वार करत एका युवकाचा खून झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाडळे शिवारात घडली. मुराद तुराब तडवी (रा. पाडळे बुद्रूक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावठी दारू विक्रेत्यांच्या आपसातील वर्चस्व वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पाडळे शिवारातील जंगलात अवैध गावठी दारू तयार करण्याच्या हातभट्टया मोठ्या प्रमाणात आहेत. या भट्ट्यांचे नुकसान केल्याच्या कारणाने मुराद तडवी याला संशयित आरोपी रशीद तडवी, रईस तडवी, हुसेन तडवीसह १० ते १२ जणांनी विळा, कुऱ्हाडीचा वार करून जिवे ठार मारले. मृत मुराद तडवी हा देखील अवैधपणे गावठी दारू तयार करण्याचे काम करत होता. व्यवसायातील स्पर्धेतून त्याचे संशयितांसोबत वैर झाले होते. याच कारणातून झालेल्या भांडणात मुराद याच्या डोक्यावर, छातीवर संशयितांनी कुऱ्हाड आणि विळ्याचे वार केले. रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी झालेल्या भांडणात मुरादचा लहान भाऊ सुलेमान तडवी (वय २५) आणि वडील तुराब जहांबाज तडवी (वय ६०) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपी रशीद शौकत तडवी, हुसेन रशीद तडवी, रईस रशीद तडवी यांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट देवून पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम करत आहेत. रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. महाजन यांनी मृताचे शवविच्छेदन केले. त्याच्यावर पाडळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ, वडील असा परिवार आहे.