जळगाव - व्हॉट्सअॅपवर भावनिक स्टेटस ठेऊन एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना जळगावातील अयोध्यानगर परिसरातील सद्गुरू नगरात मंगळवारी रात्री घडली असून, ती आज (बुधवारी) सकाळी उजेडात आली. हर्षल प्रेमनाथ महाजन (वय 29, रा. सद्गुरू नगर, जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
हर्षल महाजन हा एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. तो सद्गुरू नगरात पत्नी, आई-वडील आणि भाऊ यांच्यासोबत राहत होता. काल आई-वडिलांसह जेवण केल्यानंतर तो रात्री 10 वाजता झोपला. मध्यरात्रीनंतर घरात सर्वजण झोपलेले असताना त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
वडिलांच्या निदर्शनास आली घटना -
आज पहाटे वडील प्रेमनाथ एकनाथ महाजन यांना हर्षलने आत्महत्या केल्याचे दिसून आले. मृतदेह पाहून घरातील कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान, सकाळी मृत हर्षल महाजन याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षलने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झाले नाही. मानसिक तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जुन्या निकषांवर भरपाई मिळावी- देवेंद्र फडणवीस
हर्षलने व्हाट्सऍपवर ठेवले भावनिक स्टेटस -
आत्महत्या करण्यापूर्वी हर्षलने त्याच्या व्हॉट्सअॅपवर एक भावनिक स्टेटस ठेवले आहे. 'माझ्यामुळे लोकांचे मूड ऑफ झाले पण मी स्वतः दुनियेतून ऑफ होत आहे. मी माझ्या छोट्याश्या जीवनाचा प्रवास खूप छान केला. लोकांच्या मनावर, अनेकांच्या डोक्यात अधिराज्य केले आणि मित्रपरिवार छान लाभले. माझे आई-वडील हे दुनियेतील खूप छान देव माणूस आहेत. पुढचा जन्म त्यांच्या पोटी जन्माला यावं ही देवाला प्रार्थना करतो आणि मी कोणालाही याचे जिम्मेदार समजत नाही. कोणाला काही चुकीचे बोलले गेले असेल तर माफी मागतो. मला माफ करा' असे स्टेटस ठेऊन त्याने जगाचा निरोप घेतला.
हेही वाचा - 'कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर राज्यातील सत्तांतराचे पाहू'