जळगाव - छातीत दुखत असल्याने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. उपचार सुरू असताना सोमवारी रात्री ही तरुणी बेडवरून खाली पडली होती. त्यानंतर प्रकृती चिंताजनक होऊनही रुग्णालय प्रशासनाने दखल न घेतली नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणीचा मृत्यू झाला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. भाग्यश्री रमेश पाटील (वय 19, रा. दादावाडी परिसर, जळगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे.
मृत भाग्यश्री हिच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, दोन दिवसांपूर्वी त्रास जाणवत असल्यामुळे कुटुंबीयांनी तिला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. तिच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यानंतर सोमवारी सायंकाळी सहा वाजता तिला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारी मध्यरात्री भाग्यश्री बेडवरून खाली पडली. सुमारे 20 मिनिटे भाग्यश्री बेडच्या खाली पडून होती. तिच्या तोंडावरील ऑक्सिजन मास्क देखील बाजूला झाला होता. तरी देखील डॉक्टरांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
बेडवरून खाली पडल्याने तोंडावरील ऑक्सिजन मास्क निघाला. त्यामुळे ती अधिक अत्यवस्थ झाली. तिचे वडील आयसीयूच्या गेटजवळ आले. मुलगी बेडच्या खाली पडलेली दिसून आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड करत तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले. यानंतर कर्मचाऱ्यांनी घाई-गडबडीने भाग्यश्रीला उचलून पुन्हा बेडवर ठेवले. यानंतर काही तासांतच म्हणजेच पहाटे पाच वाजताच्या सुमारास भाग्यश्रीचा मृत्यू झाला.
हेही वाचा - धक्कादायक : गोदावरी रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल; गुन्हा दाखल करण्याची मागणी
दरम्यान, या घटनेसंदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी यांनी सांगितले की, तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, अचानक प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टर्स तिच्या उपचारावर लक्ष ठेऊन होते. कुठेही हलगर्जीपणा झालेला नाही. हवे तर चौकशीत अतिदक्षता विभागातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे. रुग्णालय प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केलेला नाही, असे ते 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, नर्स यांनी हलगर्जीपणा केल्यामुळेच मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप भाग्यश्रीच्या वडिलांनी केला. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दुपारी कुटुंबीयांनी भाग्यश्रीचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. मृत भाग्यश्री अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेत होती. तीन दिवसांपूर्वी याच रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे येथील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. या घटनेला काही तास उलटत नाहीत, तोच पुन्हा एक वादाचा प्रकार घडला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
हेही वाचा - हिंगणा तालुक्यात डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे रुग्णाचा मृत्यू
हेही वाचा - धक्कादायक! नागपुरात पुरुषाच्या मृतदेहाऐवजी नातेवाईकांना सोपवला महिलेचा मृतदेह, अंत्यसंस्कारापूर्वी उलगडा