जळगाव - औरंगाबाद महामार्गावर विमानतळासमोर दोन भरधाव दुचाकी एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात झाला. आज (बुधुवार) दुपारी १ वाजता हा अपघात झाला. या अपघातात एका तरुण जागीच ठार झाला. तर दुसऱ्या एका दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे.
प्रितेश सुरेश रायपुरे (वय २८, रा. सुप्रीम कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील विकास चंपालाल बारेला हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत प्रितेश हा तरुण अविवाहित होता. तो शिवाजीनगरातील एका वर्कशॉपमध्ये काम करीत होता. बुधवारी दुपारी तो दुचाकीत (क्रमांक एमएच १९ एवाय ८६२६) पेट्रोल भरण्यासाठी घरातून निघाला होता. प्रितेश हा कुसुंबा गावाकडे निघाला होता. याचवेळी विमानतळासमोरुन विकास बारेला हा तरुण शहराकडे दुचाकीने भरधाव वेगात येत हाेता. विकास व प्रितेश या दोघांच्या दुचाकी एकमेकांना समोरा-समोर धडकल्या. दोन्ही दुचाकींचा वेग जास्त असल्यामुळे या अपघातात प्रितेशचे डोके आणि छातीवर जबर मार लागून तो जागीच ठार झाला. तर विकास हा गंभीर जखमी झाला.
या अपघातानंतर रस्त्यावरील इतर वाहन चालकांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, इम्रान सय्यद, निलेश पाटील, मुदस्सर काझी, असीम तडवी यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त दुचाकी रस्त्याच्या बाजूला केल्या.
खिशातील कागदपत्रांवरुन पटली मृताची ओळख-
गोविंदा पाटील यांनी जखमी विकास याला रिक्षातून रुग्णालयात हलवले. तर इतर कर्मचाऱ्यांनी मृत प्रितेशचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला. खिशातील कागदपत्रांवरुन मृत प्रितेशची ओळख पटवण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. मृत प्रितेश याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे प्रितेशच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला. कुटुंबीय, नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.