जळगाव - कोरोनाबाधित महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केली. रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शहरातील नीलकमल हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला. याप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांनी धाव घेत हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.
शहरातील स्टेट बँक कॉलनीतील रहिवासी असलेल्या एका 50 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना 29 सप्टेंबर रोजी उपचारासाठी नीलकमल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्या महिलेची प्रकृती खालावल्याने तिला ऑक्सिजन लावण्यात आलेले होते. तरीही महिलेच्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती. प्रकृती खालावत असल्याने त्यांचा रविवारी दुपारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन गोंधळ घातला.
हलगर्जीपणाचा आरोप करत केली तोडफोड -
महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत संताप व्यक्त केला. हा वाद विकोपाला गेल्याने महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. यावेळी संतप्त नातेवाईकांपैकी एका तरुणाच्या हाताला काच लागल्याने तो जखमी झाला. या घटनेमुळे रुग्णालयात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
नातेवाईकांचे डॉक्टरांवर गंभीर आरोप -
मृत महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर गंभीर केले. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेची प्रकृती खालावत असताना त्यांना व्हेंटिलेटरची सुविधा देण्यात आली नाही. व्हेंटिलेटरची वारंवार मागणी करूनही डॉक्टरांनी दुर्लक्ष केले, म्हणूनच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप डॉक्टरांवर करण्यात आला.
तोडफोडीमुळे इतर रुग्णांच्या जीविताला धोका -
रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील मृत महिलेच्या नातेवाईकांवर काही आरोप केले आहेत. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. रुग्णालयातील ऑक्सिजन सिस्टिमचे सिलिंडर देखील काढून टाकले. ऑक्सिजनवर असलेल्या इतर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, असा आरोप डॉक्टरांनी केला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त नातेवाईकांची समजून घातली. त्यानंतर महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी ताब्यात घेतला.