जळगाव - कौटुंबीक वाद प्रकरणी न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या एका महिलेने चक्क झाडावर चढून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गुरुवारी ही घटना घडली. सुदैवाने, पोलिसांनी तिला झाडावरुन सुखरूप खाली उतरवल्याने अनर्थ टळला.
झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणारी 23 वर्षीय महिला ही चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील रहिवासी आहे. जळगाव तालुक्यातील गाढोदा हे तिचे माहेर आहे. अडीच ते तीन वर्षांपूर्वी तिचे विरवाडे येथील व्यक्तीशी लग्न झाले असून तिला दीड वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर पती-पत्नी पुण्यात राहत होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबीक वाद सुरू आहेत. याच वादामुळे सासरच्या मंडळीने दीड वर्षांच्या मुलीला त्यांच्याकडेच ठेऊन घेतले आहे. मुलगी ताब्यात मिळावी म्हणून, सध्या त्यांचा वाद न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाने तीन वेळा नोटीस बजावूनदेखील सासरची मंडळी मुलीला तिच्या ताब्यात देत नाही. शिवाय गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलीस सासरच्या लोकांवर कारवाई करत नसल्याने संबंधित महिलेला खूप मनःस्ताप सहन करावा लागत आहे. गुरुवारी याच वादासंदर्भात न्यायालयात तारीख होती. तारखेला येण्यापूर्वी महिलेच्या सासरच्या मंडळीने वकिलाकडून हमीपत्र लिहून मुलीला ताब्यात देणार असल्याचे फोनवर सांगितले होते. मात्र, सासरची मंडळी जळगावात आली तेव्हा त्यांनी मुलीला सोबत आणले नाही. याच विषयावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाले. याबाबत तक्रार करण्यासाठी संबंधित महिला पोलीस अधीक्षकांची भेटी घेण्यासाठी कार्यालयात आली होती. पण, पोलीस अधीक्षक कार्यालयात नसल्याने तिने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले.
हेही वाचा - नागपूर : दहावीत मनपाच्या शाळांचा ८५.२८ टक्के निकाल तर, तीन शाळांचा १०० टक्के निकाल
कार्यालयाच्या बाहेर असलेल्या झाडावर चढून तिने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब शेजारीच असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ धाव घेत, महिलेला झाडावर खाली उतरण्याची विनंती केली. परंतु, ती महिला कोणाचेही ऐकून घ्यायला तयार नव्हती. बराच वेळ विनवणी केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला झाडावरून खाली उतरवले. यादरम्यान, घटनास्थळी पोलिसांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, संबंधित महिलेला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्याठिकाणी तिची विचारपूस करण्यात येत आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेनंतर संबंधित महिलेचे आई-वडील देखील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांनी आमच्या मुलीच्या सासरच्या मंडळींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली. तसेच जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर 15 ऑगस्टला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी दिला.