जळगाव - दोन दिवसापासून झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने कोथिंबीर, पालक, शेपू, मेथी आदी भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे कोथिंबीर २५ ते ३० रुपये जुडीप्रमाणे विक्री होत आहे. तर पालक, शेपू १० रुपयांना एक मिळत आहे. टोमॅटो २० ते २५, बटाटे २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. नवीन भाजीपाला येण्यासाठी ४० दिवस तरी लागणार आहेत. तोपर्यंत नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे.
कोरोनामुळे शेतकऱ्यांना आपला माल विक्री करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाबाधित क्षेत्रात भाजीपाला विक्रेतेही जाण्यास घाबरत असल्याने कमी विक्री झाली आहे. त्यामुळे भावात सतत चढउतार होत आहेत. मात्र, लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने नागरिकांची बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. परिणामी भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यातच अचानक झालेल्या पावसाने भाजीपाला खराब झाला आहे. शेतात अगदी कमी प्रमाणात शिल्लक राहिला आहे.
शहरात किरकाेळ विक्रेत्याकडे भाजीचे दर
१५ रुपयांत दोन जुड्या येणारे पालक, कोथिंबीर, शेपूच्या जुडीसाठीच आता १० ते २५ रुपये मोजावे लागत आहेत. पुढील ४० दिवस सर्वांनाच महागाईचा सामना करावा लागणार आहे. ४० दिवसांत नवीन भाजीपाला येण्यास सुरुवात होईल, अशी माहिती भाजीपाला विक्रेत्यांनी दिली आहे.