जळगाव - राज्य शासनाकडून कोरोना लसीचे 15 हजार डोस प्राप्त झाल्याने जळगाव जिल्ह्यातील थांबलेली लसीकरणाची प्रक्रिया शुक्रवारपासून (30 एप्रिल) पुन्हा एकदा सुरू झाली. मात्र, लसीचे हे डोस पुढचे अवघे दोन दिवस पुरणार आहेत. अशा परिस्थितीत वेळेवर लस उपलब्ध झाली नाही तर लसीकरणाच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा परिणाम होण्याची शक्यता आहे. लसीकरणाची प्रक्रिया अखंडपणे सुरू राहण्यासाठी राज्य शासनाने पुरेशा प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आता लसीकरणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभत आहे. पण, इच्छुक लाभार्थींच्या तुलनेत लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने जळगाव जिल्ह्यात लसीकरणाची गती मंदावली आहे. लसीचे डोस संपल्याने गेल्या 4 ते 5 दिवसांपासून जिल्ह्यातील एक-दोन केंद्रांचा अपवाद सोडला तर एकाही केंद्रावर लसीकरण होऊ शकले नव्हते. मात्र, गुरुवारी रात्री जिल्ह्यासाठी 15 हजार डोस मिळाले. त्यामुळे आज सकाळपासून लसीकरणाला प्रारंभ झाला.
फक्त शासकीय केंद्रांवर होणार लसीकरण-
जिल्ह्यातील 133 केंद्रांवर सद्यस्थितीत लसीकरण केले जात आहे. यात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह महापालिका व नगरपालिका रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच काही प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. याशिवाय लसीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळावी म्हणून काही खासगी रुग्णालयांमध्येही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही सेवाभावी संस्थांच्या मदतीने देखील लसीकरण होत आहे. मात्र, लसीचे डोस पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने गर्दी व लसीकरण प्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केवळ शासकीय केंद्रांमध्ये लसीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून शुक्रवारी लसीकरण सुरू झाले असले तर जिल्ह्यातील खासगी केंद्रांवर ते बंद होते. यामुळे अनेक नागरिकांचा हिरमोड झाला.
लसींचा पुरवठा होत नसल्याने नागरिक हैराण-
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची टक्केवारी वाढण्याची गरज आहे. म्हणून प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. त्याला प्रतिसाद देत नागरिक आता लसीकरण करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने समोर येत आहेत. परंतु, लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याने ही प्रक्रिया वारंवार बंद पडत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये लसीकरण प्रक्रिया सुरू झाल्याची बातमी येताच नागरिक लसीकरण केंद्रांवर मोठ्या संख्येने गर्दी करताय. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास तर सहन करावा लागतच आहे, शिवाय गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे, अशा भावना काही नागरिकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या.
हेही वाचा - आजपासून महापालिकेच्या ५ केंद्रांवर १८ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण; नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्य