जळगाव - जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर जळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुसंख्य भागात अवकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. वातावरणातील बदलामुळे रब्बीच्या हंगामावर परिणाम होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदा संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात थंडीचा कडाका वाढला होता. तर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीत घट येऊन चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पुन्हा थंडीचा जोर वाढला. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीचा कडाका वाढू लागला होता. तसेच उत्तरेकडून येणारे शीत वारे देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते. मात्र, पुन्हा बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे राजस्थानपर्यंत जावून उत्तरेकडील थंड वाऱ्यांना धडकल्याने चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तापमानात ८ ते १० अंशांची वाढ-
गेल्या तीन ते चार दिवसांपासून जळगाव शहरात दिवसभर अंशत: ढगाळ वातावरण होते. यामुळे तापमानात देखील वाढ झाली आहे. बुधवारी शहराचा किमान तापमानाचा पारा १८ अंशावर होता. तर आज गुरुवारी शहराचा किमान तापमानाचा पारा १९.२ इतका आहे. कमाल तापमानात देखील २ अंशाची वाढ झाली. ढगाळ वातावरणामुळे गारवा कमी झाला आहे. दरम्यान, अजून चार ते पाच दिवस वातावरण स्थिर राहण्याची शक्यता असून, पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.
रब्बीची पिके धोक्यात-
ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामाला फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे हरभरा व मक्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासह गव्हाच्या वाढीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. अवकाळीचा अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा - ममुराबाद शिवारात बिबट्या आढळला मृतावस्थेत; हत्या केल्याचा वन्यप्रेमींना संशय
हेही वाचा - केळीच्या फुलापासून मधुमेहावर गुणकारी सूप; डॉ. तेजोमयींच्या संशोधनाला पेटंट