जळगाव - रावेर तालुक्यातील पाल गावाजवळ सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या रावेर पोलिसांवर काही अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेनंतर गोळीबार करणारे पोलिसांना गुंगारा देत पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, पोलिसांवर गोळीबार करणारे जंगलात प्राण्यांची शिकार करणारे शिकारी होते की दरोडा टाकण्यासाठी आलेले दरोडेखोर होते, हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीवरून जाताना केला गोळीबार -
रावेर पोलीस ठाण्याची पोलीस व्हॅन (एमएच १९ एम ०६८१) नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री पाल परिसरात गस्त घालण्यासाठी गेली होती. व्हॅनमध्ये पोलीस कर्मचारी श्रीराम कांगणे यांच्यासह गृहरक्षक दलाचे सुनील तडवी, कांतीलाल तायडे आणि अमित समर्थ होते. पाल परिसरात गस्त घातल्यानंतर ते रावेरकडे परत येत होते. पहाटे ३ वाजताच्या सुमारास सहस्त्रलिंग गावाजवळ पोलीस कर्मचारी एका ढाब्यावर चहा पिण्यासाठी थांबले. तेव्हा रावेरकडून त्यांना दोन दुचाकी रस्त्यावरून जाताना दिसल्या. इतक्या मध्यरात्री कोण आहे, हे पाहण्यासाठी पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी त्यांना थांबविण्याच्या प्रयत्न केला. मात्र, पहिली दुचाकी वेगात पालकडे निघून गेली. दुसऱ्या दुचाकीस्वाराने पोलिसांना पाहताच दुचाकी थांबवली. त्याचवेळी दुचाकीवरील मागील व्यक्तीने पोलिसांच्या गाडीच्या दिशेने गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबाराने पोलीस गोंधळून गेले. हीच संधी साधून गोळीबार करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
बंदूक घटनास्थळीच पडली -
दुचाकीवरील दोघा अज्ञातांनी गावठी बनावटीच्या बंदुकीतून गोळीबार केला. त्यानंतर पळून जाताना गडबडीत ही गावठी बंदूक त्यांच्या हातून खाली पडली. या बंदुकीचा वापर करून हे चौघे शिकार करण्यासाठी आले होते की दरोडा घालण्यासाठी आले होते, हे कळू शकले नाही. या घटनेनंतर मंगळवारी सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.