जळगाव - कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केल्याने हातावर पोट असलेल्या गोरगरिबांच्या दोनवेळ जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाच गोरगरीब भुकेलेल्यांना अन्नदान करून घरी परतत असताना रिक्षाला अपघात झाल्याने दोन तरुण ठार झाले. ही दुर्दैवी घटना आज रात्री 8 च्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गलवाडे गावाजवळ घडली. या अपघातात रिक्षातील इतर तरुण देखील गंभीर जखमी झाले आहेत.
ऋषिकेश उमेश शेटे (वय २०) व विशाल दिनेश पाटकरी (वय १८) अशी मयतांची नावे असून ते अमळनेर शहरातील वडचौक येथील रहिवासी होते. दोघेही आपल्या ६ ते ७ मित्रांसोबत अमळनेर तालुक्यातील मुडी, मांडळ परिसरात अन्न वाटप करण्यासाठी गेले होते. अन्न वाटप केल्यानंतर घरी परतत असताना झाडी गाव ओलांडल्यावर त्यांची रिक्षा उलटली. या अपघातात ऋषिकेश व विशाल यांना जबर मार बसल्याने ते जागीच ठार झाले. या अपघातात जयेश रमेश पाटील हा जबर जखमी झाल्याने त्याच्यावर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. तर अक्षय नंदकुमार महाजन व चेतन राजेंद्र चौधरी हे किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे अमळनेर शहरावर शोककळा पसरली आहे. अपघातात ठार झालेले दोन्ही तरुण हे सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असायचे. दोघेही मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.