जळगाव - चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथून नांदगाव रस्त्यावर मुरूम वाहतूक करताना ट्रॅक्टरची ट्रॉली खराब रस्त्यामुळे पलटी झाली. ट्रॉलीमधील मुरूमावर मजूर बसलेले होते. त्यांना काही कळण्याच्या आतच ट्रॉली पलटी होऊन मुरूमाच्या ढिगाऱ्याखाली दोघेजण दबले गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
खराब रस्त्यामुळे पलटली ट्रॉली
रस्त्याच्या कामासाठी मुरूमाची वाहतूक सुरू आहे. ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू असून, आज देखील काम सुरू असताना हिरापूर (ता. चाळीसगाव) येथील रेल्वे स्थानकाजवळील नांदगाव रस्त्यावर मुरूम घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली खराब रस्त्यामुळे अचानक पलटी झाली. यात खाली दबल्याने दोन मजूर ठार झाल्याची घटना आज रविवारी चार वाजेच्या सुमारास घडली. याच वेळी येथून जाणारे जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी रुग्णवाहिका बोलावून, ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना तातडीने जेसीबी घेऊन दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात आले.
पोलीस घटनास्थळी दाखल
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचा प्रयत्न केला. पावड्याच्या सहाय्याने मुरूम काढून दबलेल्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, दोन्ही जण ट्रॉलीखाली दबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेजण अनोळखी असून मृतांची ओळख पटविण्यात येत आहे. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.