जळगाव- भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे तरूण जागीच ठार झाले. हा अपघात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मेलाने ते कर्जाने रस्त्यावर मंगळवारी घडला.
लक्ष्मण बाबू पावरा (वय 26) आणि सुरेश हण्या पावरा (वय 27) (दोघे रा. बोरमळी, ता. चोपडा) अशी मृतांची नावे आहेत. लक्ष्मण व सुरेश हे दुचाकीवरून चोपड्यावरून बोरमळीकडे निघाले होते. त्याचवेळी बोरमळीकडून चोपड्याच्या दिशेने जाणाऱ्या बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर बस चालकाचेही बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला गेली. त्यामुळे बसमधील सुनीता हिंमत पावरा (वय 30, रा. जिरायतपाडा) ही महिला देखील जखमी झाली.
हेही वाचा -शिखर बँक घोटाळाप्रकरणी गुन्हे दाखल : सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार - ईश्वरलाल जैन
या अपघातानंतर बस चालक संजय धनगर हे स्वतःहून चोपडा पोलीस ठाण्यात हजर झाले. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरू आहे. गेल्या तीन दिवसात चाळीसगाव, रावेर आणि आता चोपड्यात झालेल्या दुचाकी अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - जळगावात पोलीस ठाण्यासमोरच चोरी; मेडीकल दुकान फोडून सव्वा लाखांची रोकड लंपास