जळगाव - पुणे, औरंगाबाद शहरातून दुचाकी चोरून जळगावात आणणाऱ्या दोन अट्टल दुचाकीचोरांना जळगाव पोलिसांनी अटक केली. रात्रभरात केलेल्या चौकशीत या दोघांनी चोरीच्या सात दुचाकी पोलिसांकडे दिल्या आहेत. नीळकंठ सूर्यकांत राऊत (वय ४०, रा. अडावद, ता. चोपडा) व ज्ञानेश्वर गुलाब पाटील (वय २९, रा. वडगाव, ता. चोपडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वेगवेगळ्या गुन्ह्यात संशयित असलेले हे दोघे आरोपी चोपडा तालुक्यात एकमेकांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी दुचाकीचोरीचा धडाका सुरू केला. दोन महिन्यांपूर्वी राऊत याने पुण्यातून दोन दुचाकी चोरुन आणल्या होत्या. यानंतर दोघांनी मिळून जळगाव शहरातून आणखी पाच दुचाकी चोरल्या. शनिवारी (१७ ऑक्टोबर) सायंकाळी हे दोघे आरोपी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात दुचाकी चोरण्यासाठी पाहणी करत होते. त्यांच्या संशयास्पद हालचालीपाहून शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनी दुचाकीचोरीची कबुली दिली.
या दोघांनी रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग येथील एका पाड्यावर चोरीच्या दुचाकी लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांच्या पथकाने या सर्व दुचाकी ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणल्या आहेत. यातील दोन दुचाकी पुण्यातून चोरलेल्या आहेत. तर उर्वरित शहरातील बळीरामपेठ, सिव्हिल हॉस्पिटल, जैन कंपनी, सुप्रीम कंपनी येथून चोरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.