जळगाव - केळी उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना जळगाव तालुका पोलिसांनी अटक केली असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
अशोक रघुनाथ पाटील (वय 53 वर्षे, रा. निंभोरा, ता. रावेर) व सय्यद गंभीर सय्यद सांडू (वय 60 वर्षे, रा. सावदा, ता. रावेर), असे अटक केलेल्या संशयित व्यापाऱ्यांची नावे आहेत. तर फिरोज गंभीर तडवी (रा. अमोदा, ता. यावल) व सय्यद इब्राहिम सय्यद गंभीर (रा. सावदा, ता. रावेर) हे दोन संशयित बेपत्ता आहेत.
पहिल्या गुन्ह्यात नारायण तुकाराम सोनवणे (रा. धानोरा बु., ता.जळगाव) यांनी तक्रार दिली आहे. नारायण सोनवणे यांची 1 लाख 38 हजार 334 रुपयांची केळी अशोक पाटील या व्यापाऱ्याने खरेदी केली होती. पण, त्याचे पैसे दिले नव्हते. सोनवणे यांनी पैसे मागितले असता पाटील बेपत्ता झाला होता. अखेर सोनवणे यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार दाखल गुन्ह्यात पाटील याला अटक करण्यात आली.
तर दुसरा गुन्हा 16 सप्टेंबर, 2020 रोजी दाखल करण्यात आला. यात बाळू प्रेमराज पाटील (रा. गाढोदा, ता. जळगाव) यांनी तक्रार दिली आहे. बाळू पाटील यांची 1 लाख 41 हजार 389 रुपयांची केळी सय्यद गंभीर सय्यद सांडू याच्यासह तिघांनी खरेदी केली होती. पण, पाटील यांचे पैसे न देता तिघे जण बेपत्ता झाले होते. यातील सय्यद गंभीर याला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अद्यापही दोन संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दोघांच्या शोधासाठी तपास पथके रवाना झाली आहेत.
हेही वाचा - ...म्हणून अंड्यांची मागणी वाढली; जळगावात शेकडा 600 रुपयांचा विक्रमी दर