जळगाव -राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात ३ जण ठार झाले आहेत. तर ट्रॅव्हल्समधील १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यवतमाळ येथील टाईम स्टार नावाची स्लिपर कोच ट्रॅव्हल्स यवतमाळहून सुरतला जाण्यासाठी निघाली होती. तर लोखंडी पाईप घेऊन ट्रक भुसावळच्या दिशेने जात होता. महामार्गावर दोन्ही बाजुंनी चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. वाहनांना सरळ एका रांगेत जावे लागत आहे. अशात मध्यरात्री रस्त्याचा अंदाज चुकल्यामुळे ट्रॅव्हल्स व ट्रक एकमेकांवर आदळले. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या कॅबिन चक्काचूर झाल्या. याशिवाय ट्रकमधील लोखंडी पाईप ट्रॅव्हल्सवर आदळून मोठे नुकसान झाले. ट्रॅव्हल्समधील काही प्रवाशांना लोखंडी पाईपाचा मार लागल्यामुळे ते जखमी झाले. या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मदतकार्य सुरू होते.
अपघातातील जखमींची नावे अशी-
विनोद राठोड, राधा राठोड, पूनम राठोड (तिघे रा. भांबोरा, यवतमाळ), नारायण विनायक तांबोळे (वय ४५, रा. यवतमाळ), गजानन चावके (रा. दिग्रस), संतोष अग्निहोत्री (रा. दिग्रस), अतीश पवार (रा. खामगाव), चंपाबाई समारकर (वय ६५), शंकर राठोड (वय ३८), संदीप गजानन वाघोदे (वय ३२, रा. अकोला), गजानन नचिकेत बोरकर (वय ७०) व कविता शंकर राठोड (वय ४२) हे १२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गोदावरी तसेच जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.