जळगाव - वरिष्ठ सहकाऱ्यांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली होती. पायल तडवींना बुधवारी रात्री त्यांचे सासर असलेल्या रावेरमध्ये नागरिकांनी कँडल मार्च काढून श्रद्धांजली वाहिली.
रावेर शहरातील मुख्य चौकात पायल तडवी यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी रावेर शहरातील नागरिकांसह विविध सामाजिक संघटना, आदिवासी संघटना एकत्र आल्या होत्या. सर्वांनी हाती कँडल घेत पायल यांना श्रद्धांजली अर्पण केली. तडवी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सारे सहभागी आहोत, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
जातीवाचक रॅगिंग करत पायलचा सतत अमानुष छळ करणाऱ्या त्यांच्या वरिष्ठ सहकारी अंकिता खंडेलवाल, हेमा आहुजा आणि भक्ती मेहेर यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून भविष्यात असा प्रकार कोणी करणार नाही, अशी एकमुखी मागणी देखील यावेळी नागरिकांनी केली.