जळगाव- शहरात वाढत जाणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महापालिका कार्यक्षेत्रात 3 दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. आज (शनिवारी) या जनता कर्फ्यूचा दुसरा दिवस असून, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला आहे. शहरातील बाजारपेठेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापना सोडल्या तर इतर सर्व दुकाने बंद आहेत. रस्त्यांवर देखील नागरिकांची वर्दळ नाही. दरम्यान, जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठेतील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने व्यापाऱ्यांनी ही जोखीम पत्करली आहे.
जनता कर्फ्यूमुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प या गोष्टींना निर्बंधजळगावात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 12 ते 14 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेत दवाखाने व मेडिकल्स, शासकीय कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह, दूध विक्री केंद्र तसेच कृषी क्षेत्रातील आस्थापना, गॅरेज अशा बाबींना या जनता कर्फ्यूतून सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या बाबींना प्रशासनाकडून सूट नसून कडक निर्बंध आहेत. या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेतून किराणा माल, भाजीपाला व फळे विक्रीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत.
चौकाचौकात पोलीस बंदोबस्तजनता कर्फ्यूची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज दुसऱ्या दिवशी पोलीस दुचाकीवरून जाणाऱ्यांची चौकशी करत होते. ज्यांच्याकडे अत्यावश्यक सेवेतील ओळखपत्र आहे, त्यांना सोडले जात होते. तर जे विनाकारण बाहेर फिरत होते, त्यांना मात्र पोलीस लाठ्यांचा प्रसाद देत असल्याचे चित्र दिसून आले.
रस्ते पडले ओसजळगावात उन्हाचा तडाखा वाढत असल्याने दुपारी शहरातील सर्वच रस्ते ओस पडले होते. टॉवर चौक, नेहरू चौक, सुभाष चौक, बळीराम पेठ, दाणा बाजार, फुले व गोलाणी मार्केटचा परिसर एरवी गर्दीने गजबजलेला असतो. मात्र, जनता कर्फ्यूमुळे याठिकाणी शुकशुकाट आहे. रेल्वे व बसस्थानक परिसरात प्रवाशांची संख्या तोकडी असल्याने तेथेही फारशी वर्दळ नव्हती. रिक्षातून फक्त दोन प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी असल्याने मोजक्या रिक्षा चालकांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे.
कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल थांबलीजळगाव शहर हे सोने व चांदी, धान्य, डाळींच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. शहरात दररोज बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असतात. परंतु, जनता कर्फ्युमुळे सर्वच व्यवहार ठप्प असून, आर्थिक उलाढाल शून्यावर आली आहे. जनता कर्फ्यू तीन दिवसांचा आहे. या तीन दिवसात ठप्प झालेल्या उलाढालीचा आकडा मोठा असणार आहे. शहरातील दाणा बाजार, सराफ बाजार तसेच मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये काम करणारा मजुरवर्ग देखील जनता कर्फ्युमुळे घरी बसून आहे.
सराफ बाजारात 100 ते 125 कोटींची उलाढाल ठप्पसराफ बाजारातील उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड म्हणाले की, जळगाव सराफ व्यापारासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी सुमारे 225 ते 250 सराफ व्यावसायिक आहेत. जळगावात दररोज 45 ते 50 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. जनता कर्फ्युमुळे गेल्या दोन दिवसात 100 ते 125 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. उद्या देखील जनता कर्फ्यू लागू असणार आहे. सराफ बाजारात अलीकडे रविवारी देखील व्यवहार सुरू असतात. मात्र, जनता कर्फ्युमुळे उद्याही व्यवहार होणार नाहीत. त्यामुळे ठप्प झालेल्या उलढालीचा आकडा हा वाढण्याची शक्यता असल्याचे मत सोने व्यापारी लुंकड यांनी व्यक्त केले.
दाणा बाजारात 'शटर डाऊन'जळगावातील दाणा बाजार हा किराणा तसेच धान्य मालाच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी दररोज कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असतात. मात्र, जनता कर्फ्युमुळे दाणा बाजारातील सुमारे 250 ते 300 व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली आहेत. जळगावात बाहेरून येणाऱ्या मालाची आवक देखील थांबली आहे. या माध्यमातून दाणा बाजारात देखील गेल्या दोन दिवसात सुमारे 100 ते 125 कोटी रुपयांची उलाढाल थांबली आहे, अशी माहिती दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.