जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी पुन्हा 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 22 वर पोहचली आहे. सोमवारी आढळलेल्या 4 बाधित रुग्णांपैकी भुसावळातील 3 तर जळगाव शहरातील जोशी पेठेतील एका रुग्णाचा समावेश.
कोरोना बाधित असलेल्या 4 रुग्णांमध्ये 3 पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. या बाधित रुग्णांपैकी 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यातील एका रुग्णाचा तपासणीसाठी आणण्याअगोदरच मृत्यू झाला आहे. तर एका रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रुग्ण भुसावळ येथील आहेत. जळगाव जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या रुग्णांपैकी स्वॅब घेण्यात आलेल्या 52 रुग्णांचे तपासणी अहवाल सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. यामध्ये 4 रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले असून, उर्वरित 48 रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अमळनेर शहरापाठोपाठ आता भुसावळ शहरात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. भुसावळात आतापर्यंत 5 कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोना बळींची संख्या 7 वर-
आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित 22 रुग्णांपैकी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहरातील 1, अमळनेरातील 4 आणि भुसावळ शहरातील 2 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज जळगाव शहरात तिसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यापूर्वी शहरातील मेहरूण आणि सालार नगरात कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता. त्यापैकी मेहरूणमधील रुग्ण कोरोनातून बरा झाला आहे. तर सालार नगरातील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता जोशी पेठेतही तिसरा रुग्ण आढळला आहे. या रुग्णाला कोरोनाचा लागण कशी झाली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. खबरदारीच उपाय म्हणून या रुग्णाच्या नातेवाईकांसह त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना तत्काळ क्वारंटाईन करण्यात आले असून जोशीपेठ परिसर सील करण्यात आला आहे.